श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल, शिर्डी आयोजित श्री साईबाबा राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

शिर्डी, दि. २० जुलै : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलमार्फत दि. १४ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित श्री साईबाबा राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी संपन्न झाली.
श्री साईबाबांचे जीवनचरित्र, त्यांची शिकवण, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा आणि प्रभावी वक्तृत्वकलेचा विकास होऊन उत्कृष्ट वक्ते घडावेत, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी (लहान गट) व इयत्ता ८ वी ते १० वी (मोठा गट) अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. दोन्ही गटांतील स्पर्धकांना श्री साईबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित विषय देण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्री साईबाबांच्या जीवनकार्याची ओळख होऊन त्यांच्या विचारांचा व्यापक प्रचार-प्रसार होण्यास मदत झाली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान गटात ७१ संघांनी, तर मोठ्या गटात ७६ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रु. ११,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. ८,०००, तृतीय क्रमांकासाठी रु. ५,००० तसेच उत्तेजनार्थ रु. १,००० रोख पारितोषिकांसह श्री साईचरित्र ग्रंथ, श्री साईबाबा चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र व श्री साईचरित्र ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेची नोंदणी पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली होती. तसेच सहभागी स्पर्धकांच्या अल्पोपहार, भोजन व निवासाची व्यवस्था संस्थानामार्फत करण्यात आली होती.
स्पर्धेच्या निकालानुसार लहान गटात सहकार विद्यामंदिर, बिबी (ता. लोणार, जि. बुलढाणा) येथील विधी विनोद माळोदे व धनश्री जगन जायभाय यांनी प्रथम क्रमांक, जेटाभाई ठाकरशी सोमैया हायस्कूल, बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील वेदश्री अमोल शेळके व जयश्री सचिन छल्लारे यांनी द्वितीय क्रमांक, श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर, शिर्डी येथील स्वारा नितीन पावसे व ईश्वरी जनार्दन वाणी यांनी तृतीय क्रमांक, तर ओम गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक सेमी गुरुकुल, कोकमठाण येथील साईशा गोरख सोनवणे व वैष्णव सत्यवान ननिमसे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. मोठ्या गटात श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय, संगमनेर येथील आरोही गणेश सुपेकर व नमिता मंगेश सांगळे यांनी प्रथम क्रमांक, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर, कोपरगाव येथील अंजली नंदकिशोर औताडे व माहेश्वरी गणेश शेलार यांनी द्वितीय क्रमांक, श्री साईनिर्माण इंग्लिश मिडीयम स्कूल, शिर्डी येथील सृष्टी अंकुश राठोड व काव्यांजली मंगेश कासार यांनी तृतीय क्रमांक, तर सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कोपरगाव येथील पलक प्रसाद उदावंत व उन्नती राजेंद्र खंडीझोड यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
सदर राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले, प्रभारी प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अतुल वाघ तसेच शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र कोहोकडे यांनी केले.




















