लोणी खुर्द स्वच्छ–सुंदर करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा संयुक्त प्रयत्न
राहाता | प्रतिनिधी
तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोकसहभागातून गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्वच्छता अभियानात सरपंच जनार्दन घोगरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती घोगरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ, युवक, शालेय विद्यार्थी, महिला, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत श्रमदानातून स्वच्छतेचा प्रभावी संदेश दिला.
यावेळी गावातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर तसेच मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या,
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. लोकसहभागातूनच खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर व समृद्ध गाव उभे राहू शकते. आज ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी असून ही स्वच्छतेची चळवळ सातत्याने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे.
यावेळी सरपंच जनार्दन घोगरे यांनी सांगितले,
“हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, प्रत्येक आठवड्यात एक दिवस नियमितपणे स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण लोणी खुर्द गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.

या स्वच्छता उपक्रमामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, लोणी खुर्द ग्रामपंचायतने राबवलेली लोकसहभागाची ही स्वच्छता चळवळ इतर गावांसाठीही आदर्श ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.




















