
श्री साई-श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालयात *जागतिक कर्णबधिर दिन* उत्साहात साजरा.
श्री साई-श्रद्धा ग्रामीण मूकबधिर विद्यालय (निवासी) येथे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी जागतिक कर्णबधिर दिन अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या विविध उपक्रमांचे दिवसभर आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी व साईदर्शनाने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या परिसरात विविध क्रीडा, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचा शुभारंभ शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सन्माननीय जयश्रीताई थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, “या दिव्यांग कर्णबधिर मुलांप्रती माझ्या मनात विशेष आत्मीयता आहे. आज या विद्यार्थ्यांमध्ये येऊन मला खूप आनंद झाला. त्यांच्या शिक्षणाचे व सर्वांगीण विकासाचे कार्य अत्यंत कष्टाचे आहे. विद्यालयातील शिक्षक आणि संस्थापक मा. माधवराव चौधरी सर हे कार्य अतिशय आत्मीयतेने व समर्पणभावनेने करीत आहेत. त्यांच्या कार्याचे मनापासून अभिनंदन.”
विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा कृतीतून व्यक्त करत जयश्रीताईंनी स्वतःच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप केले. त्यांच्या या प्रेमळ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
दिवसभरात विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये धावणे, बादलीत बॉल टाकणे, चमचा-लिंबू, फुगे फुगवून ग्लास उचलणे, संगीत खुर्ची, चित्रकला आणि रांगोळी अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची आणि कल्पकतेची सुंदर झलक सादर केली.
स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा राहाता येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुरेशजी पाचरे यांच्या शुभहस्ते गुणगौरव करण्यात आला. गेल्या सहा ते सात वर्षांपासून डॉ. पाचरे हे दिव्यांग विद्यार्थ्यांची कोणतीही फी न घेता विनामूल्य सेवा देत आहेत. विद्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणपद्धतीचे, शिक्षकांच्या कार्याचे तसेच संस्थापकांच्या योगदानाचे कौतुक केले. “दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात अत्यंत चांगले आणि आत्मीयतेने काम केले जात आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमासाठी लोकआवाज वृत्तपत्राचे पत्रकार राजूभाई पठाण यांचीही आवर्जून उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ. वैशालीताई चौधरी मॅडम, प्र. मुख्याध्यापक श्री. पाटील वाय. ए.सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सोळसे बी. बी. यांनी केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य, त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने निर्माण झालेले आनंदाचे वातावरण आणि उपस्थित मान्यवरांचे प्रेमळ प्रोत्साहन यामुळे जागतिक कर्णबधिर दिनाचा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच अविस्मरणीय आणि प्रेरणादायी पर्व ठरला.





















