

संगमनेर तालुक्यातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची हिल या शैक्षणिक संकुलात नुकतीच शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा या संकुलाचे संस्थापक, अॅड. शालीग्राम होडगर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती. या वेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते माजी मुख्याध्यापक सर्जेराव मते यांचे “व्यक्तीमत्व विकास” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संचालक सुनिल आढाव, संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे, सचिव निलिमा गुणे उपस्थित होते.
यावेळी मते यांनी व्यक्तीमत्व विकासासाठी आवश्यक असणारे गुण शिक्षकांनी अंगी बानवावेत असे विविध उदाहरणासह स्पष्ट करुन व्यक्तीमत्व विकासाची गरज विषद केली.
व्यक्तीमत्व विकासासाठी शिक्षकामध्ये आनंदी वृत्ती, निरोगीपणा, जिज्ञासु वृत्ती, जागरुकता, अभ्यासु वृत्ती, भाषेवर प्रभुत्व, नवीन स्विकारण्याचा दृष्टीकोन, सुसंवाद साधण्याची कला, नम्रता, तत्परता, माहिती संकलनाची आवड, आपला मुद्दा पटवून देण्याची कला, स्वयंशिस्त, माणसे जोडण्याची कला, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार इत्यादी गुणांची गरज असून शिक्षकांनी सतत कार्यरत राहुन त्यांच्या कार्यापासून कधीही निवृत्त होवु नये. तसेच चांगला मित्र परिवार मिळून सल्ला देणे व घेणे या मार्फत समृध्द जीवन जगावे. शिक्षकांनी विविध शैक्षणिक माहिती संकलीत करुन तिचा वापर विद्यार्थ्यांच्या हितासाठी करावा. निसर्गाशी नाते जोडून निसर्गाबरोबर रहावे. आपले जीवन जगत असतांना आपले मित्र, नातेवाईक, पूर्वज, यांना जरुर धन्यवाद द्यावेत. शिक्षकांनी सतत वर्तमानात व आपल्या इच्छेनुसार जगावे कारण, आपणाकडे फक्त वर्तमानच आहे. हे त्यांनी सतत लक्षात ठेवावे. प्रेरणा दिल्याने प्रत्येकाची कार्य करण्याची उमेद वाढते. ही प्रेरणा आपणांस आपला समृध्द वारसा, प्रतिके, प्रत्यक्ष बस्तु, परंपरा, घोषवाक्य यामधुन मिळते. याबाबीचा खुबीने वापर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी करावा. शिक्षकांकडे व्यक्तीगत नितीमत्ता व पारदर्शकता गरजेची असुन समोरील व्यक्तीस समजुन घेण्याची कलाही आवश्यक आहे असेही ते म्हणाले. हे पटवून देण्यासाठी त्यांनी विविध संतांची वचने, म्हणी, सुविचार व काव्य यांची जोड देवून, सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करतांना मंत्रमुग्ध करुन टाकले.
व्यक्तीमत्व विकासातुनच विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास घडवून आणता येवू शकतो हे त्यांनी यातुन पटवून दिले.
या अगोदर सुनिल आढाव यांनी पाहूण्यांचा परिचय करुन दिला. संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे यांच्या हस्ते पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शशिकांत गमे यांनी केले. तर आभार योगिता डुकळे यांनी मानले. यावेळी किसन हजारे, पंडीत डेंगळे, गंगाधर चिंधे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















