*: काष्टीतील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम; जनता कन्या विद्यालयात शालेय साहित्य वाटप*

*काष्टी (प्रतिनिधी) -* श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता कन्या विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये महंमद पैगंबर जयंतीनिमित्त गावातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन विद्यार्थिनींना संपूर्ण शालेय साहित्य वाटप करून समाजापुढे एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
दि. २७ रोजी सकाळी १० वाजता शाळेतील आर्थिकदृष्ट्या गरीब, होतकरू, अनाथ व हुशार विद्यार्थिनींना वह्या, पुस्तके, पेन, स्कूल बॅग असे वर्षभर लागणारे संपूर्ण शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम तालुक्याचे माजी सभापती अरुणराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी परिक्रमा संकुलाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा पाचपुते, सहकार महर्षी काष्टी संस्थेचे अध्यक्ष राकेशभाऊ पाचपुते, संजय काळे, सुनील पाचपुते, गंगाराम कोकाटे, अनिल पाचपुते, सुदर्शन पाचपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी सभापती पाचपुते म्हणाले, “देशात जाती-धर्माचे राजकारण सुरू असताना आमचे काष्टी गाव याला अपवाद आहे. गावातील हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात. यात्रा उत्सवात मुस्लिम बांधव सहभागी होतात, तर ईद, मोहरम, पैगंबर जयंतीला आम्ही सहभागी होतो. मुस्लिम बांधवांचा हा आदर्श इतर समाजानेही घ्यावा.”
आदर्श शिक्षक जमीर शेख यांनी पैगंबर जयंतीनिमित्त त्यांचा जीवनपट विद्यार्थिनींना सांगितला.

यावेळी हाजी मेहबूबभाई शेख, गुलाबभाई तांबोळी, सलाउद्दीनभाई शेख, शफीभाई मणियार, रफीकभाई इनामदार, गणीभाई जकाते, इरफान बागवान, अकबर बागवान, वसीम बागवान, इकबाल बागवान, हारून पठाण, जलील शेख, साहिल शेख, महेबूब शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
सूत्रसंचालन रफिक शेख यांनी केले तर मुख्याध्यापिका मंगल जोगदंड यांनी आभार मानले.




















