*ज्येष्ठ संपादक वसंतराव देशमुख पुरस्काराने सन्मानित दिलीपराव खरात यांचा राहाता नगरपरिषदेत विशेष सत्कार*

*राहाता:*
श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने दिला जाणारा *ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार* राहाता शहरातील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार *दिलीपराव खरात* यांना जाहीर झाला. या सन्मानिमित्त राहाता नगरपरिषदेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
हा पुरस्कार 30 जुलै रोजी ज्येष्ठ काँग्रेस नेते *बाळासाहेब थोरात* आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष *जयंत पाटील* यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बातमीदारीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्रीरामपूर नगरपालिकेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती.
राहाता नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या सत्कार सोहळ्याला मुख्याधिकारी *वैभव लोंढे*, नगराध्यक्ष *डॉ. स्वाधीन गाडेकर*, उपनगराध्यक्ष *विजय सदाफळ*, ज्येष्ठ नेते *मुकुंदनाना सदाफळ*, गटनेते *शफिक मुन्ना भाई शहा*, माजी नगराध्यक्ष *कैलास सदाफळ*, पतसंस्था फेडरेशनचे *राजेंद्र वाबळे* तसेच नगरसेवक दशरथ तुपे, राहुल सदाफळ, अजय आग्रे, मयूर पाळंदे, प्रविण बोरकर, संदीप मुर्तडक, प्रविण रुणवाळ आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. *जयंत गायकवाड*, पत्रकार *सतीश वैजापूरकर* आणि साम टीव्हीचे पत्रकार *सचिन बनसोडे* यांनी दिलीपराव खरात यांच्या पत्रकारिता जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा गौरव केला. काही वक्त्यांनी विनोदी शैलीत अनुभव सांगत कार्यक्रमाला रंगत आणली.
गटनेते शफिक मुन्ना भाई शहा आणि माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांनीही आपल्या आठवणींना उजाळा देत खरात यांच्या निष्पक्ष आणि धाडसी पत्रकारितेचे कौतुक केले. यापुढेही अशाच प्रभावी पत्रकारितेची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी खरात यांचे बंधू वसंतराव खरात यांचा ही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते. अनेकांनी यापुढे राहाता नगरपालिकेनेही असा पुरस्कार सोहळा आयोजित करावा अशी मागणी केली.





















