*खरंच काळ बदलतोय की पालकत्व….?*

पालक मेळाव्यात इयत्ता 7वीच्या 22 पैकी 22 पालकांची एकच तक्रार होती. *”मुले वाचनच करत नाहीत.”*
पण वाचन क्षमता कमी झाली म्हणजे त्यांची आकलन शक्ती आणि कल्पनाशक्तीही कमी झाली आहे. मुलांना स्क्रीन टाईम, मोबाईल, युट्यूब, चॅट GPT ची सवय लागली आहे. त्यामुळे धडपड करून शिकण्याची सवय गेली आहे. इन्स्टंट रिझल्ट मिळत असल्याने संयम आणि सातत्य संपले आहे.
*समस्या का निर्माण झाल्या?*
*1) कल्पनाशक्तीच्या प्रगल्भतेचा अभाव*
पूर्वी आम्ही वाचून मनात चित्रे उभी करायचो. आज व्हिडिओमुळे कमी वेळात उत्तर मिळते, पण स्वतः विचार करण्याची सवय गेली.
*2) घराघरातील बदलत्या वातावरणाचा प्रभाव*
पूर्वी घरात वर्तमानपत्र, मासिके असायची. मोठी माणसे वाचताना दिसायची. त्यामुळे मुले आपोआप वाचायची. आता घरात मोबाईल, गॅजेट्स, ई-बुक्स आले. पालक-मुलांमधला संवाद कमी झाला. त्यामुळे शब्दसंपत्ती आणि वाचन कमी झाले.
*3) नव्या-जुन्या शिक्षण पद्धती*
पूर्वी आम्ही तिकिटे गोळा करणे, चित्र काढणे, डायरी लिहिणे, नाण्यांचा संग्रह असे प्रकल्प करायचो. आज मुलं फोटोग्राफी, व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर लाईक्स मिळवणे यालाच मोठं मानतात. 7वीच्या मुलांचेही इंस्टाग्राम अकाउंट असतात.
*4) मैदानी खेळांची जागा ऑनलाईन गेम्स ने घेतली*
आमच्या पिढीत विटी-दांडू, सायकल, लपाछपी असे खेळ होते. त्यातून खूप काही शिकायचो. आजची पिढी तासन् तास ऑनलाईन गेम्स, लाईक-फॉलो, कमेंट करण्यात गुंतली आहे.
*5) खूप काही शिकण्याच्या नादात मूळ संस्कारांना कितपत महत्व?*
आज मुलं कोडिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक्स, पॉडकास्ट, परदेशी भाषा शिकतात. चांगली गोष्ट आहे. पण त्यांना मातृभाषेतील साधे शब्द आठवतात का? आई-वडिलांचा आदर करतात का? ते स्वार्थी, एकलकोंडे तर होत नाहीत ना?
*6) घरातील नात्यांचे व संवादाचे स्वरूप बदलले आहे*
पूर्वी एकत्र कुटुंब होते. एकत्र जेवण, सुख-दुःख वाटून घेणे होते. आता एकाच घरात वेगवेगळ्या भिंती झाल्या आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात तणाव वाढला आहे.
*7) कायदे आणि भीतीचा अभाव*
“सर बिनधास्त मारा, पण मुलं सुधारा” असा पालकांचा सूर होता. पण यामुळे मुलांची भीती संपली आहे. “8वी पर्यंत काहीही केले तरी पास होणार” हे मुलांना कळल्याने 9वीत मोठा शैक्षणिक धक्का बसतो.
—
*उपाय आणि नकळत बदल*
अशा गंभीर समस्यांवर उपाय म्हणून मी वर्गात काही बदल केले. त्याचा सकारात्मक बदल जाणवला.
1. *वाचन:* विद्यार्थ्यांनी आठवड्याला एक अवांतर पुस्तक वाचून त्यावर दहा मिनिटे व्यक्त व्हायचे.
2. *आत्मविश्वास:* जो विद्यार्थी घटक समजावून सांगेल त्याला लेखी सूट. त्यामुळे मुले बेसिक गणित स्वतःच्या क्षमतेने करायला लागली.
3. *संवाद:* दररोज हजेरीनंतर घरातील वातावरणावर चर्चा, घरचा अनुभव शेअर करणे.
4. *विचारशक्ती:* अनेक टास्क देऊन अशा प्रसंगांना कसे तोंड द्याल याबाबत चर्चात्मक उपक्रम.
5. *नाविन्यपूर्ण अभ्यास:* स्वतःच्या मनाने अभ्यास करतील असा नाविन्यपूर्ण अभ्यास दिला. त्यामुळे मुले नावीन्यपूर्ण विचार करायला लागली.
6. *पालकांची भूमिका:* पालकांनी मुलांसमोर वर्तमानपत्रे तथा पुस्तके वाचायला घ्यावीत. मोबाईल न घेता घरातील चर्चेत सहभागी करून घ्यावे.
7. *वेळ द्या:* पालकांनी मुलांना महागड्या वस्तू तथा गॅझेट्स देण्यापेक्षा तुमचा फुकटचा वेळ दिलात तर ते क्षण मुले कधीच विसरत नाहीत.
8. *मोबाईल नियंत्रण:* मोबाईल हातात घेतल्यास लगेच शिक्षकांना फोन करणे. पालकांनी मोबाईलची सेटिंग चेंज करून घेणे.
9. *संस्कार डायरी:* “मी आज दररोज काय शिकलो तथा कोणता संस्कार मला मिळाला” हे फक्त एका ओळीत दररोज लिहायचे.
10. *मूल्यमापन:* लेखी तंत्राऐवजी स्वानुभव, सादरीकरण, संस्कारक्षमता तथा प्रकल्प या तंत्रांचा भारांश वाढवला.
11. *चॅलेंजर ऑफ द विक:* दर शनिवारी एक टास्क. उदा. 1-100 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ करणे, आठवडाभर मोबाईल कमी वापरणे. जो यशस्वी सादरीकरण करेल तो “चॅलेंजर ऑफ द विक”.
*निष्कर्ष*
समस्त वाचक हो, मुले ही आपल्या स्वतःची, गावची व राष्ट्राची खरी संपत्ती आहे. ही पिढी संस्कारक्षम घडली तरच आपले कुळ ते राष्ट्राचा उद्धार होणार आहे. त्यांना जे काही देता येईल ते कोणतेही कारण न सांगता सुनियोजित पद्धतीने देण्याची जबाबदारी आपली आहे. हे पालकांनी आणि शिक्षकांनी ओळखणे गरजेचे आहे…!
—
*द्वारा -*
*नाव:* श्री गोसावी वैभव दत्तात्रय
*शाळा:* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नपावाडी, ता.-राहाता, जि.-अहिल्यानगर
*पद:* पदवीधर शिक्षक
*संपर्क क्र.:* 9860477975
*ईमेल:* vaibhav75gosavi@gmail.com





















