*वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शिक्षक कैलास चिंधे यांचा अनोखा उपक्रम*
*आईच्या स्मरणार्थ शाळांना हजारो रुपयांची पुस्तके भेट; कुसुमाग्रज वाचन अभियानाला बळ*
राहता : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि गावोगावी वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने सुरू असलेल्या या अभियानाला विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या अभियानाला हातभार लावत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर येथील ज्येष्ठ शिक्षक कैलास चिंधे यांनी आपल्या आई कै. गं.भा. लक्ष्मीबाई भागवत चिंधे यांच्या स्मरणार्थ विविध शाळांच्या वाचनालयांसाठी मोठ्या प्रमाणात पुस्तके भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
शिक्षक कैलास चिंधे यांनी गणेशनगर शाळेसाठी १५ हजार रुपयांची पुस्तके, तसेच गणेशनगर केंद्रासाठी २५ हजार रुपयांची पुस्तके उपलब्ध करून दिली. याशिवाय वाकडी, बोरावके वस्ती आणि चितळी येथील शाळांच्या वाचनालयांसाठीही मोठ्या प्रमाणात पुस्तके भेट देण्यात आली आहेत.
त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, ज्ञानाची भूक आणि चिंतनशील वृत्ती निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
“वाचन ही केवळ सवय नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. एका विद्यार्थ्याच्या हातात दिलेले पुस्तक त्याच्या संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देऊ शकते,” या भावनेतून चिंधे यांनी केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे गटविकास अधिकारी विवेक गुंड, गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ आणि केंद्रप्रमुख सचिन घुसळे यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षक कैलास चिंधे यांनी घेतलेला पुढाकार इतर शिक्षक व समाजातील दानशूर व्यक्तींसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
आईच्या स्मृतीला पुस्तकांच्या माध्यमातून जिवंत ठेवत विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचा ठेवा देण्याचा शिक्षक कैलास चिंधे यांचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने ‘वाचन संस्कृतीची समृद्ध परंपरा’ निर्माण करणारा ठरत आहे.





















