मतदार यादी सर्वेक्षणात कसूर करणाऱ्या BLO वर कारवाई करा; मनविसेचे शिर्डी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

शिर्डी (प्रतिनिधी): मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत बीएलओंनी घरोघरी जाऊन अचूक सर्वेक्षण करावे. या कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वाघचौरे यांच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रशासनाने या मागणीवर तातडीने कार्यवाही न केल्यास मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे व मनसे तालुकाध्यक्ष गणेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
सध्या मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत बीएलओंनी प्रत्येक घरात जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी या कामात दिरंगाई होत असून काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे अनेक पात्र नागरिक मतदार यादीतून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मनविसेने संबंधित निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मतदार यादीचे काम पारदर्शक, अचूक आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना मनविसेचे शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वाघचौरे यांच्यासह मनसे शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, चेतन झिंजाड, अभिषेक पोपळघट, साई कुमावत, गौरव भालेराव, ऋषी धिवर, प्रवीण आसने, रवी कुसळकर व किरण पगारे आदी पदाधिकारी आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















