आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात शिर्डीत भीमसैनिकांचा एल्गार!
हजारो आंबेडकरी अनुयायांचा महामोर्चा; भाजप सरकारच्या धोरणांवर वक्त्यांचा घणाघात, मातंग समाजाविरोधात नसून उपवर्गीकरणाविरोधात लढा असल्याची स्पष्ट भूमिका

शिर्डी (प्रतिनिधी) : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक वातावरण तापले असताना शिर्डीत हजारो भीमसैनिकांनी एकत्र येत भव्य महामोर्चा काढला. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवत आंबेडकरी समाजाने आपल्या एकजुटीचे दर्शन घडविले. महामोर्चानंतर आयोजित जाहीर सभेत विविध वक्त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
शिर्डीतील समाज मंदिर येथून या महामोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांतील भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणांनी शिर्डी शहर परिसर दुमदुमून गेला.
काही दिवसांपूर्वी शिर्डीत मातंग समाजाच्या वतीने आयोजित मोर्चातील काही वक्त्यांनी बौद्ध समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप आंबेडकरी समाजातील आंदोलकांनी केला. या वक्तव्यांमुळे समाजात नाराजी निर्माण झाली असून त्याचे पडसाद या महामोर्चात उमटल्याचे दिसून आले.
मातंग समाजाविरोधात नव्हे, उपवर्गीकरणाच्या धोरणाविरोधात लढा!
जाहीर सभेत वक्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आमचा लढा मातंग समाजाच्या विरोधात नाही. मातंग समाज हा आमचाच बांधव आहे. मात्र, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कोणत्याही परिस्थितीत समर्थन दिले जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही काही वक्त्यांनी दिला.
अॅड. सुरेश माने यांचा सरकारला सवाल
यावेळी अॅड. सुरेश माने यांनी भाजप सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाबाबत निर्णय दिला. मात्र, देशातील सर्वच राज्यांनी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केलेली नसताना महाराष्ट्रात एवढी घाई का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात आंबेडकरी समाजाचे उपवर्गीकरणाविरोधातील आंदोलन सुरू झाल्यानंतर इतर समाजांचेही मोर्चे निघू लागले आहेत. या आंदोलनांमागील आर्थिक पाठबळाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काही राजकीय नेत्यांकडून मातंग समाजाच्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचे आरोप होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या शिफारशींच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील भूमिहीन मातंग समाजाला प्रत्यक्षात किती जमीन वाटप करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एक-दोन राजकीय पदांसाठी संपूर्ण समाजाचे नुकसान होऊ देऊ नका, असे आवाहन करत आमचा लढा मातंग समाजाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून देवेंद्र फडणवीस सरकारच्या धोरणांविरोधात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महामोर्चात विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
यावेळी अॅड. सुरेश माने, बाळासाहेब गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, प्रदीप बनसोडे, अॅड. अनिल शेजवळ, सोपान जगताप, सिमोन जगताप, नितीन शेजवळ, नाना त्रिभुवन, नितीन धिवर, सचिन गायकवाड, प्रविण आल्हाट, धनंजय निकाळे, दीपक गायकवाड, कैलास शेजवळ, चांगदेव जगताप, अलकाताई शेजवळ, विमल मोरे, रमादेवी धिवर, स्वप्नील पारडे, विलास शेजवळ, रविंद्र शेजवळ, सचिन बनसोडे, अनिल गायकवाड, गणेश निकाळे, सुनील शिरसाठ, आशिष शेळके, करण कोळगे, विलास साळवे, संदीप मगर, जितेंद्र रणशूर, संजय खामकर, बापू ठाकरे, बबलू कांबळे, राजेंद्र भुजबळ राजाभाऊ पालंदे आदींसह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.




















