लोणी खुर्दमध्ये आमदार स्व. चंद्रभान भाऊसाहेब घोगरे पाटील यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी – २१०१ वृक्षांचे वाटप
शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार, लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक आणि सहकार-विकास चळवळीचे अध्वर्यू स्व. चंद्रभान भाऊसाहेब घोगरे पाटील यांची १०१ वी जयंती लोणी खुर्द येथे अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि कृतज्ञतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
लोणी खुर्द येथील रयत शिक्षण संस्था महाविद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था या तीनही ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
स्व. चंद्रभान दादांनी सार्वजनिक जीवनात लोकल बोर्ड सदस्य म्हणून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,
श्रीरामपूर तालुका सूतगिरणीचे संस्थापक संचालक,
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक व विश्वस्त,
प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष,
शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार,
अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली.
दादांचे व्यक्तिमत्त्व साधेपणाचे, सर्वसामान्यांना हाताशी धरून मदत करणारे, गावाला गावपण देणारे आणि सर्वांसाठी उपलब्ध असे होते. ग्रामीण विकास, शिक्षण, सहकार, रोजगारनिर्मिती आणि न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्याची आठवण आजही तितकीच जिवंत आहे.
रयत शिक्षण संस्था महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी दादांची शिक्षण क्षेत्रातील बांधिलकी, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उभ्या केलेल्या संधींची उजळणी करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना ग्रामस्थांना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून २१०१ वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात दादांनी गावातील ऐक्य, शांतता आणि वाद मिटवण्याची परंपरा कशी जपली यावर भाष्य करण्यात आले.ग्रामस्थांनी दादांनी लोकांचे कौटुंबिक, सामाजिक, शेतीचे किंवा कोणतेही प्रश्न कसे मनापासून सोडवले याची आठवण झाली.
विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये झालेल्या कार्यक्रमात दादांच्या सहकार क्षेत्रातील कामांचा गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे,ग्रामीण संस्था सक्षम व्हाव्यात यासाठी दादांनी घेतलेले प्रयत्न उपस्थितांनी स्मरले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती घोगरे या दादांच्या आठवणींनी भावूक झाल्या. त्या म्हणाल्या
“दादांनी कधीही बडेजाव दाखवला नाही. त्यांनी लोकांसाठी आयुष्यभर झटत साधेपणाने काम केले. प्रत्येक सामान्य माणसाच्या अडचणीत ते स्वतः उभे राहून मदत करत. मला आज वैयक्तिक काहीही अपेक्षा नाही ना पैसा, ना प्रतिष्ठा. फक्त दादांची शिकवण जपत गाव एक राहिले पाहिजे, गावपण टिकले पाहिजे. पक्षभेद न ठेवता सर्वांनी एकत्र राहणे हीच खरी परंपरा आहे.
यावेळी दादांचे अनेक ज्येष्ठ सहकारी उपस्थित होते.त्यांनी दादांच्या साधेपणाची, माणुसकीची, नेतृत्वगुणांची आणि लोकाभिमुख कारभाराची आठवण काढली.
“आम्ही दादांसोबत काम केलेला प्रत्येक क्षण आजही आठवणींमध्ये जिवंत आहे,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमास सरपंच जनार्दन घोगरे, दत्तात्रय घोगरे, जेष्ठ आबासाहेब आहेर, देवमन घोगरे, चांगदेव घोगरे, हरिभाऊ घोगरे, पेटकर सर, भास्कर आहेर, मंगेश घोगरे, बाळासाहेब आहेर, कैलास आहेर, अण्णा तुपे, अमोल घोगरे, महेश आहेर, सचिन आहेर तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची परंपरा गावात आजही तितक्याच आदराने कायम आहे.त्यांच्या जयंतीनिमित्त लोणी खुर्द ग्रामस्थांनी कृतज्ञता, श्रद्धा आणि एकजुटीचा सुंदर संगम अनुभवला.




















