राहाता: दिवाळीत फटाक्यांमुळे उसाच्या शेताला आग – नगरपरिषद व साई संस्थानच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

दिवाळीनिमित्त फटाके फोडताना लागलेल्या आगीत उसाचे शेत पेटले, दोन्ही अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात – नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्याकडून जवानांचे अभिनंदन
*राहाता (शिर्डी आवाज न्यूज) -* दिवाळीनिमित्त फटाके फोडत असताना लागलेल्या आगीमुळे राहाता शहरातील ऊसाच्या शेताला आग लागली. यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती, मात्र राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या सतर्कता आणि तत्परतेने मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या समवेत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अग्निशामक वाहन देखील त्वरित हजर झाले.
दोन्ही अग्निशामक दलांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
या कामात अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा उल्लेखनीय होती. त्याचबरोबर स्थानिक नागरिक *सचिन मेहेत्रे, विनोद बनकर, अरुण मेहेत्रे, प्रसाद बोठे, संदीप मेहेत्रे, सुरेश वाकचौरे, निवृत्ती गायकवाड, रोहित गिधाड, किशोर गिधाड, पप्पू जेजुरकर, धनंजय बनकर, रुपेश बनकर* आदी नागरिकांच्या मदतीमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात आली.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष *डॉ. स्वाधीन मंगला किसनराव गाडेकर*, मुख्याधिकारी *वैभव लोंढे*, नगरसेवक *संदीप मुर्तडक, विजय गिधाड* आदी उपस्थित होते.
*नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राहाता नगरपरिषद सदैव तत्पर आहे*, असे नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांनी सांगितले. तसेच राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलातील सर्व अधिकारी व जवानांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

*आवाहन:* आनंदाचा सण साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घ्या. फटाके फोडताना विशेष दक्षता बाळगा.




















